अध्यापन प्रभावी करण्याचं एक उत्तम माध्यम!
शिक्षणामध्ये तंत्रज्ञान वापरताना अनेक गोष्टींचा मेळ लावणं हे आता शिक्षकांचं कौशल्य बनलं आहे. या अगोदर तुम्ही पीपीटी अर्थात पावर पॉइंट प्रेझेंटेशन हा शब्द ऐकला असेल. सोप्या भाषेत सांगायचंच झालं तर कॉम्प्युटरवर विविध स्लाईड्सच्या माध्यमातून सादरीकरण करणं याला आपण पावर पॉइंट प्रेझेंटेशन असं म्हणतो. याचा आपण थोडा ॲडव्हान्स वापर केला तर आपण ॲनिमेटेड पीपीटीच्या साह्यानं नेहमीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यांसमोर आपलं सादरीकरण करता येऊ शकतं, आपला विषय त्यांच्यासमोर आणखी चांगल्या पद्धतीनं मांडता येऊ शकतो. यासाठी ॲनिमेटेड पीपीटी आपल्याला वापरता येऊ शकते.
ॲनिमेटेड पीपीटी या नावावरुनच तुमच्या लक्षात आलं असेल की, असं सादरीकरण ज्याच्यामध्ये ॲनिमेशन आहे. ॲनिमेशन म्हणजे स्क्रीनवर दिसणारी विशिष्ट प्रकारची हलचाल. मग ती कार्टूनच्या बाबतीत असेल, अक्षरांच्या बाबतीत किंवा चित्रांच्या बाबतीत असेल. या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमेशनचा वापर पीपीटी मध्ये केल्यामुळं मुलांचं अभ्यासातलं अवधान जास्त वेळ टिकलं जातं. सहाजिकच मुलांचं अवधान जितकं जास्त टिकलं जाईल, तितकी त्यांची ग्रहणक्षमता, समजून घेण्याची क्षमता वाढणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मी या प्रकारच्या ॲनिमेटेड पीपीटीचा वापर करतोय. त्यातून एक गोष्ट मी निश्चितपणानं आपल्याला सांगू इच्छितो की, अगदीच साधी पीपीटी आणि ॲनिमेटेड पीपीटी यांचा आपण तुलनात्मक अभ्यास केला, या दोन्हीपैकी काय चांगलं आहे याचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला उत्तर सापडेल ते म्हणजे 'ॲनिमेटेड पीपीटी'. कारण मुलांना कार्टून्स सारख्या गोष्टी खूप आवडतात. त्यातल्या हालचाली त्यांच्या चिरकाल लक्षात राहतात आणि हाच धागा पकडून जर आपण शिक्षणामध्ये जर ॲनिमेशन आणलं तर त्यांची अभ्यासातील प्रगती वाढवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. शिक्षकांनी एखादा धडा शिकवला, कविता शिकवली तर काही काळासाठी ती लक्षात राहू शकेल पण ॲनिमेटेड पीपीटी चा वापर करून जर हा धडा परत एकदा घेतला तर याचा परिणाम हा खूप जास्त वेळ ह्या सर्व गोष्टी लक्षात राहण्यासाठी होतो. आज मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवरही आपण या पीपीटी चे सादरीकरण करू शकतो. याच्या आधारे मुलांचा अभ्यास घेणं, त्यांची आवड, त्यांची ग्रहणक्षमता, त्यांची स्मरणशक्ती, त्यांची विचार करण्याची क्षमता यामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. म्हणून मला असं वाटतं की, अध्यापनामध्ये जर आपण ॲनिमेटेड पीपीटी चा जर प्रभावी वापर केला तर मुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला मदतच होईल.
Share Post