अ‍ॅनोटेशन

l1

कित्येकदा विद्यार्थ्यांना शिकवत असताना शिक्षकांना फळ्यावर महत्त्वाच्या गोष्टींची काही टिपणं, काही नोंदी कराव्या लागतात. तेव्हा ते एखाद्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या त्या शब्दाला अधोरेखित करणं, वेगळ्या रंगानं रंगवणं, विशिष्ट चिन्हाच्या खूणा करणं किंवा त्या शब्दाला एखादी चौकट वा राऊंड मारणं अशा गोष्टी अनेकदा शिक्षक करत असतीलच. या सगळ्या गोष्टी आपण फळ्यावर, कागदावर आजपर्यंत केल्या असतील. पण आजच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये जेव्हा पीपीटी, व्हिडिओ किंवा अन्य काही गोष्टींच्या माध्यमातून जेव्हा आपण टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईलवर सांगत, शिकवत असतो तेव्हा अशी व्यवस्था असण्याची गरज प्रकर्षानं जाणवते. पण आता शिक्षणामध्ये जसजसं तंत्रज्ञानाचा वापर वाढायला लागलाय तसतसं या गरजेतून नवनवीन कल्पना समोर येत आहेत.
स्क्रीनवरच टिपणं काढणं, एखाद्या गोष्टीला राऊंड करणं, एखाद्या गोष्टीबद्दल कॉमेंट लिहिणं आदी गोष्टींची व्यवस्थाही आता उपलब्ध होत आहे आणि यालाच तंत्रज्ञाच्या भाषेमध्ये अ‍ॅनोटेशन असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर अ‍ॅनोटेशन म्हणजे अशी व्यवस्था, ज्या मध्ये आपण पीडीएफ, फोटो किंवा mp4 अशा कोणत्याही फॉरमॅटमध्ये आपल्याला महत्त्वाच्या वाटणार्‍या मुद्दांना, एखाद्या गोष्टीला अधोरेखित करणंं किंवा एखाद्या गोष्टीला बाणाने दर्शवणं यासारख्या गोष्टी करू शकतो. यामुळं एखादी गोष्ट समोरच्याला चांगली पटवून द्यायची असेल त्यासाठी अशा अ‍ॅनोटेशनचा उपयोग होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या पुस्तकामध्ये आपण एखादा मुद्दा आवडला, महत्त्वाचा वाटला तर कशी अंडरलाईन करतो किंवा तिथे बाजूला काहीतरी मार्किंग करतो अगदी तशी मार्किंग पीडीएफ पुस्तकमध्येही अ‍ॅनोटेशनच्या माध्यमातून करता येते आणि कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट मोबाईल, स्मार्ट टीव्ही इत्यादी डिवाइसवर देखील करता येते.
सध्या प्ले स्टोअरवरही अनेक ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये झोडो ॲप प्रामुख्यानं उल्लेख करता येईल. झोडो डॉट कॉम ही वेबसाईटही वापरता येईल. त्याचबरोबर एखाद्या फाइलमध्ये जर आपण या अ‍ॅनोटेशन केलेलं असेल तर ती फाईल आपल्याला इतरांना शेअरही करता येते.
एखाद्या महत्त्वाच्या मुद्यांना मार्किंग केलेलं पुस्तक जसं दुसऱ्यांना आपण वापरायला देतोय अगदी तसं. शिक्षणात याचा आपण वेगळ्या पद्धतीनं वापर करु शकतो. जसं एखाद्या पीडीएफ मध्ये मुलांना रिकाम्या जागा भरणं, गणित सोडवणं, चूक-बरोबर, अक्षरांवर गिरवणं यासाठी जर काही जागा सोडून आपण त्यात मुलांना भरण्यासाठी दिलं तर मुलं जसं परीक्षेमध्ये कागदावर लिहितात त्या पद्धतीनं त्या पीडीएफ वर अ‍ॅनोटेशनच्या माध्यमातून लिहू शकतील आणि गणितं, आपला रोजचा अभ्यास शिक्षकांना पाठवू शकतील. त्यातून शिक्षकांना मूल्यमापन करणं सुद्धा सोपे होईल आणि शिक्षकही अ‍ॅनोटेशनचा वापर करुन तपासू शकतील. चूक-बरोबर किंवा ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहेत आदी गोष्टीसुद्धा नमूद करू शकतील. आहे की नाही गंमत अ‍ॅनोटेशन वापरण्याची! चला तर मग आपल्या शिकण्या आणि शिकविण्याला अ‍ॅनोटेशनच्या माध्यमातून थोडं रंजक बनवूया.


Share Post