मुलांना वैयक्तिकरीत्या अभ्यास पाठवण्याची नामी शक्कल!
आज व्हॉट्सअॅप वापरत नाही असा शिक्षक क्वचितच मिळेल. खासकरून कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये मुलांनी रोजचा दैनंदिन अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त या व्हॉट्सअॅपचा वापर आपण करत आला असाल. कारण आज व्हॉट्सअॅप हे असं माध्यम आहे ज्यामध्ये शिक्षक मुलांना सहजरित्या तात्काळ अभ्यास देऊ शकतात. दररोजचा अभ्यास देण्यासाठी अनेक शिक्षकांनी शाळेतील मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्या माध्यमातून शिक्षक विषयनिहाय दैनंदिन अभ्यास पाठवत आहेत. वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या लिंक्स, विविध पाठाचे पीडीएफ, स्मार्ट पीडीएफ, पीपीटी, ॲनिमेटेड पीपीटी, स्वतः तयार तयार केलेले व्हिडिओज आदी ई-कंटेंट शेअर केले जातात.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दिलेला अभ्यास हा त्या ग्रुप मधल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ग्रुपमध्येच पाहता येतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेला सर्व अभ्यासही विद्यार्थी याच ग्रुपवर पोस्ट करत असतात. ग्रुपवर यामुळं अनेक पोस्ट्सचा अगदी भडिमारच पाहायला मिळतो. ज्यामुळं अनेक महत्त्वाच्या बाबी मुलांकडून, पालकांकडून कळत नकळत राहून जातात, सुटू शकतात. काही मुलांच्या चुका ग्रुप असल्यानं सार्वजनिकरित्या शिक्षकांना सांगता येत नाही. कारण सर्वांसमोर शिक्षकांनी आपली चूक सांगितली तर मुलांच्या मनाला कोठेतरी ती गोष्ट लागू शकते. यासाठी व्हॉट्सअॅपचा आणखीन एक पर्याय उपयुक्त ठरू शकतो. तो म्हणजे ‘व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट ग्रुप’. हा असा ग्रुप असतो ज्यामध्ये फक्त ग्रुप तयार करणारा शिक्षकच आपल्या मोबाईलमध्ये तयार करू शकतो. हा ग्रुप फक्त तयार करणाऱ्या शिक्षकांनाच, त्यांच्याच मोबाईलमध्येच दिसतो. या ग्रुपच्या माध्यमातून दिला जाणारा अभ्यास, विविध सूचना एकाच वेळेस जास्तीतजास्त 256 विद्यार्थ्यांना पाठवता येतात. त्याही वैयक्तिक रित्या. त्यामुळं अशा ब्रॉडकास्ट ग्रुपच्या माध्यमातून पाठवलेला अभ्यास पालकांना वैयक्तिक गेल्यामुळं नेहमीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा या माध्यमातून दिलेल्या अभ्यासाच्या बाबतीत अधिक गांभीर्य दिसून येतं. शिक्षकांनी आपल्या पाल्याला वैयक्तिक अभ्यास पाठवला असल्याचं पालकांना वाटल्यामुळं शिक्षक आपल्या मुलाकडं वैयक्तिक लक्ष देत आहेत असा पालकांमध्ये समज निर्माण करण्यामध्ये आपण शिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकतो.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी देखील विद्यार्थी शिक्षकांशी वैयक्तिक संदेशाच्या देवाणघेवाणीतून सोडवून घेऊ शकतात. त्यामुळं ग्रुपवर सर्वांसमोर एखादी शंका, अडचण विचारण्यात विद्यार्थ्यांना वाटणारी संकोचाची भावना याठिकाणी मात्र कमी दिसून येते. कारण हे सर्व वैयक्तिक माध्यमातून विद्यार्थी आपल्या शिक्षकांना विचारत असतात. ब्रॉडकास्ट ग्रुपचे हे मेसेजेस एकाच वेळेस 256 विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्यामुळं आपला वेळ, आपली मेहनत, एखादी गोष्ट वारंवार करण्याचा व पाठवण्याचा कंटाळा आदी गोष्टीपासून शिक्षकांची मुक्तता होते. सोबतच शिक्षकांचा यासाठी जाणारा खूप सारा इंटरनेट डाटा वाचवता येतो. व्हॉट्सअॅप ब्रॉडकास्ट मेसेजचे वेगवेगळे फायदे असले तरी व्हॉट्सअॅपला पण काही मर्यादाही आहेत. त्या म्हणजे विना इंटरनेट व्हॉट्सअॅप चालू शकत नाही. त्यामुळं ज्यांच्याकडं व्हॉट्सअॅप नाही किंवा स्मार्टफोन नाही अशा मुलांपर्यंत पोहोचण्यात, त्यांचा ऑनलाईन अभ्यास घेण्यास मर्यादा येतात. पण ज्यांच्याकडं इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपची व्यवस्था आहे अशांसाठी मात्र हा एक उपयुक्त असा पर्याय दिसून येतो.
Share Post