असं म्हणतात की, एक चित्र हजारों शब्दांचं काम करतं. तर मग विचार करा एक व्हिडीओ किती शब्दांचं काम करत असेल? नक्कीच एक व्हिडिओ लाखो शब्दांचं काम करु शकतो. अनेक गोष्टी आपण न सांगताही व्हिडिओच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पटवून देऊ शकतो.
आज शिक्षण क्षेत्रामध्ये देखील व्हिडिओंची निर्मिती अगदी झपाट्यानं होतांना दिसतेय. अगदी सगळ्या विषयाच्या, सगळ्या धड्यावर आज व्हिडिओ निर्मिती करण्यावर भर दिला जात आहे. यात काही कंपन्या तसंच शासनस्तरावरूनही ई-कंटेंट करीता व्हिडिओ निर्मिती केली जात आहे. व्हिडिओ निर्मिती दोन माध्यमातून करता येते. एक म्हणजे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर आणि दुसरा म्हणजे मोबाईल किंवा टॅबलेटवर. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की, मोबाईलच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती कशी करायची?
मोबाईलवर व्हिडिओ निर्मिती करत असताना ऍप्लिकेशन वापरावे लागतात. यात काही फ्री ऍप्लिकेशन्स आहेत तर काही पेड ऍप्लिकेशन्स आहेत. जर फ्री मध्ये व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी क्विक, विवा व्हिडिओ, व्हिडिओ शो, माय मुव्ही हे ऍप्लिकेशन वापरू शकता. पण याला फ्री मध्ये वापरताना वॉटरमार्क येतो. जर आपल्याला पेड ऍप्लिकेशन घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये काईनमास्टर, वंडर शो फिल्मोरा यांचा उल्लेख करता येईल. अगदी प्रोफेशनल व्हिडिओ करण्यासाठी काईनमास्टर आणि फिल्मोरा यांचा उपयोग केला जातो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कोणताही व्हिडिओ पूर्णपणे एकाच ऍप्लिकेशन मधून तयार होईलच असे नाही. अन्यही ऍप्लिकेशनचा वापर करून व्हिडिओ निर्मिती करावी लागते. उदाहरण द्यायचं झालं तर अक्षरांना ॲनिमेशन देण्यासाठी टेक्स्ट ऍनिमेशन, लेजंड आदी नावाचे ऍप्लिकेशन वापरावं लागेल. व्हिडिओ निर्मिती करताना अनेकांचा हा गैरसमज असतो की, फक्त व्हिडिओ शूटिंग केली म्हणजे आपण व्हिडिओ तयार केला. परंतु हे पूर्णपणे खरं नाही. शूट केलेल्या व्हिडिओला आपण एडिटिंग करून त्याच्यातील अनावश्यक भाग कट करणं गरजेचं असतं. काही ठिकाणी बॅकग्राऊंड म्युझिक, व्हिडिओ कशासंदर्भात आहे, तसंच एडिटिंग च्या वेगवेगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. तरच एक परिपूर्ण असा शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला तयार करता येऊ शकतो.
व्हिडिओ करत असताना तो समोरच्या मुलांचं वय समज लक्षात घेऊन त्यांना समजेल, उमजेल या पद्धतीनं सादर करणं हे व्हिडीओ निर्मिती करणाऱ्या शिक्षकांचा कौशल्यावर अवलंबून आहे. एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण धड्याचा अर्थ चांगल्या पद्धतीनं मुलांच्या समोर सादर करू शकतो. लॉकडाऊनच्या काळात त्याला आज मुलं घर बसल्या व्हिडिओ पाहूनच आपला अभ्यासक्रम, पाठ्यक्रम पूर्ण करत असल्याचा कल आपल्याला दिसत आहे. (क्रमशः)
Share Post