सध्या 'हॅशटॅग' हा शब्द अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु हॅशटॅग म्हणजे नेमकं काय? त्याचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो? कोणकोणत्या ठिकाणी हा वापरतात आणि हॅशटॅग कशा पद्धतीने तयार करावा? या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
हॅशटॅग म्हणजे # या चिन्हाला जोडून लिहिलेले शब्द होय. उदाहरण द्यायचं झालं तर माझं नाव राजकिरण आहे. हे हॅशटॅग लावून #राजकिरण असं लिहिलं जातं. एखाद्या विषयाला ठळक करण्यासाठी सुद्धा वापरला जातो. एखाद्या शब्दाला हॅशटॅग लावल्यामुळे त्याची एक लिंक तयार होते आणि आणि अशा शब्दांना जर आपण क्लिक केलं तर तो शब्द जिथंजिथं इंटरनेटवर उपलब्ध आहे तिथंतिथं त्या संदर्भातल्या पोस्ट्स, व्हिडिओज आपल्याला एका दृष्टिक्षेपात दिसायला लागतात. खास करून फेसबूक, ट्विटर, टम्बलर, युट्युब अशा सोशल नेटवर्किंग साइटवर.
तसं पाहिलं तर हॅशटॅगचा सर्वात आधी लोकप्रिय वापर ट्विटरच्या माध्यमातून झाला असला तरी आज मात्र वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर हा शब्द सर्रास वापरताना आपल्याला दिसून येतो. ट्विटरचा विचार केला तर हॅशटॅगमुळं सध्या चालू ट्रेन्स आपल्याला कळायला मदत होते. हॅशटॅगमध्ये एक पेक्षाही जास्त शब्दही लावता येतात. मोठ्या हॅशटॅग कशा पद्धतीनं करायच्या याचं आपण एक उदाहरण पाहूया. समजा सृजनशील शिक्षक हे दोन शब्द मला हॅशटॅगसाठी वापरायचे आहेत तर मी #सृजनशीलशिक्षक असा सलग शब्द तयार करेन किंवा #सृजनशील_शिक्षक अशा दोन पद्धतीनं लिहू शकतो. #सृजनशील शिक्षक असं दोन्ही शब्दांत स्पेस देऊन लिहिला तर फक्त पहिल्या अक्षराला हॅशटॅग लागेल. एकपेक्षा जास्त शब्द आपल्या जोडायचं असतील तर दोन शब्दांच्यामध्ये आपल्याला अंडरस्कोर चिन्ह _ वापरावे लागेल.
हॅशटॅग पहिल्या अक्षराला लावला जातो व बाकीच्यांच्या अक्षरांना अंडर स्कोर म्हणजे _ हे चिन्ह वापरून जोडले जाते. त्यामुळे हा संपूर्ण शब्द आपल्याला हॅशटॅग म्हणून वापरता येतो. या मध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की, दोन शब्दांमध्ये स्पेस देऊ नये म्हणजेच दोन शब्दांमध्ये रिकामी जागा सोडू नये. दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्द असतील त्या सर्व शब्दांना आपण अंडरस्कोरचे चिन्ह वापरूनच लिहावं. अशाप्रकारे मोठा हॅशटॅगही तयार करू शकतो. हॅशटॅग वापरल्यामुळे आपण लिहित असलेली माहिती अनेक लोकांपर्यंत पोचण्याची शक्यता निर्माण होते. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना थोडक्यात व्यक्त करताना सुद्धा याचा वापर आता दिसत आहे.
शिक्षणाच्या क्षेत्रातसुद्धा हॅशटॅगचा वापर वाढलेला आहे. अगदी दोन दिवसापूर्वी भारताचे शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासात नेमके काय बदल करावे यासंदर्भात शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांना #SyllabusForStudents2020 हा हॅशटॅग वापरुन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं आवाहन केलं. या संदर्भात ज्याला कुणाला आपलं मत व्यक्त करायचं आहे त्या व्यक्त केलेला मतांमध्ये वरील हॅशटॅग वापरुन मत व्यक्त करावं लागेल. यामुळं अनेकांची मतं संकलित, शोधण्यासाठी मदत. शासनालासुद्धा लोकांची मतं, कल समजून घेण्यासाठी, त्यांच्या सूचना समजून घेण्यासाठी या हॅशटॅगचा उपयोग होणार आहे. थोडक्यात काय हॅशटॅगच्या # या छोट्याशा चिन्हाच्या वापरामुळं खूप ठिकाणांची माहिती क्षणार्धात एकत्र करणं सोयीचं होतं. # हा देखील तंत्रज्ञानाचा एक वेगळ्या पद्धतीनं फायदाच म्हणता येईल.
Share Post