नाव ऐकल्यावर थोडं वेगळं वाटलं असेल, परंतु काळानुसार ही गोष्ट सुद्धा आता लागू पडेल. कारण दवाखाना, क्लिनिक, हॉस्पिटल हे शब्द आपण आतापर्यंत ऐकलेले आहेतच. पण यातून एक गोष्ट अभिप्रेत होते की, एखाद्या अडचणीवर, आजारावर ज्या पद्धतीनं या ठिकाणी उपचार केले जातात अगदी त्याच पद्धतीनं आत्ताच्या ऑनलाइन जमान्यात शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा येणाऱ्या अडचणी, समस्यावर देखील इथून पुढं समस्या निराकारण करण्याची गरज भासणार आहे. म्हणून भविष्यात ‘एज्युकेशनल ई-क्लिनिक’ ही एक नवीन संकल्पना उदयास येऊ शकते यावर माझा ठाम विश्वास आहे.
आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, एज्युकेशनल ई-क्लिनिक म्हणजे काय आणि हे कशा पद्धतीने भविष्यात काम करू शकेल यासंबंधीची थोडक्यात माहिती. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या समस्यांवरती सामान्यपणे हॉस्पिटल, दवाखाने पाहायला मिळतात अगदी तसंच आपल्या शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांच्या बाबतीत ज्या अडचणी, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सुद्धा आता अशा एज्युकेशनल ई-क्लिनिक ची गरज नजिकच्या काळामध्ये भासू शकते. त्याचं कारण असं की, कोरोनाच्या काळामध्ये हे जग शिक्षणाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत आहे. कारण प्रत्यक्ष शिकताना आणि शिकवताना येणाऱ्या अडचणीवर आता आपण ऑनलाईन लर्निंग च्या माध्यमातून मात करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे करत असताना त्यासोबत शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या समस्या निर्माण व्हायला सुरू होणार आहे.
त्याचा विचार आपण खालील मुद्द्यांच्या आधारे करूया.
1. टीचर्स क्लिनिक- टीचर्स क्लिनिक ही अशी संकल्पना असेल की, ज्यामध्ये शिक्षकांना येणाऱ्या समस्या मग त्या अध्ययनाच्या बाबतीत असतील, अध्यापनाच्या बाबतीत असतील किंवा एकंदर तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत असतील वा त्यांच्या समस्यांच्या बाबतीत असतील. त्या सोडवण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शक असं क्लिनिक्स चालू करावे लागणातील. त्यामुळे या क्लिनिकमध्ये शिक्षणतज्ज्ञ म्हणजेच ई-एज्युकेटर या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. कारण वयानुसार शिक्षकांना काही गोष्टी समजण्यात आणि समजावण्यात थोडा कमी-जास्तपणा होऊ शकतो. त्यामुळे यावर मात करण्यासाठी अशा क्लिनिकची आवश्यकता लागणार आहे.
2. स्टुडंट क्लिनिक- ज्या पद्धतीने आपण शिक्षकांच्या बाबतीत विचार केला अगदी त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या बाबतीत काही समस्या ऑनलाईनच्या काळामध्ये उद्भवू शकतात. त्या समस्या सोडवण्यासाठी काही तज्ज्ञ शिक्षक मार्गदर्शन करू शकतील. परंतु हे सगळं मार्गदर्शन जे असेल ते ऑनलाईन पद्धतीनं असेल. यामुळं प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. ते घरच्या घरी बसूनसुद्धा आपल्या समस्यांवरती तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून काही गोष्टी शिकू शकतात, समजून घेऊ शकतात. कारण कधी कधी एखादी गोष्ट घरच्यांनी सांगण्यापेक्षा बाहेरच्या व्यक्तीनं सांगितली की, त्याचा परिणाम हा अधिक असतो हा एकंदर अनुभव आहे. म्हणून एज्युकेशनल ई-क्लिनिकच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना एक वेगळं मार्गदर्शक व्यासपीठ त्यांच्या समस्यांच्या बाबतीत उपलब्ध होऊ शकते.
3. पेरेंट्स क्लिनिक- तसं पाहिलं तर शाळेचा संबंध विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी जास्त येत असला, तरी या विद्यार्थ्यांचा घरी गेल्यानंतर पालकांशी ही संबंध येत असतो. त्यामुळे शाळेमध्ये येणाऱ्या अडचणी, मग त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, असतील एकंदर यांच्या शिक्षण, आरोग्य यांच्याबाबतीमध्ये असतील. यामध्ये पालकांना काही समस्या समोर दिसत असतात अशा वेळेस पालकांनी कसं वागावं पालकांचा निर्णय कोणत्या पद्धतीनं असावा पालकांनी एकंदर मुलांना कशा पद्धतीनं समजावून सांगावं हे मुद्दे समोर येतात. कारण प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीशी पालकांचा संबंध येत नसला, तरी आपल्या पाल्याला योग्य ते शिक्षण मिळावं, आपल्या पाल्याच्या शैक्षणिक गरजा कोणत्या त्याच्याशी कोणत्या गोष्टीवर चर्चा करावी याबाबत पालकांना विचार करायलाच लागतो. त्यावेळेस येणाऱ्या समस्यांना पालकांकडून उत्तर सांगणं अपेक्षित असतं आणि अशा वेळेस पॅरेंट्स क्लिनिक ही संकल्पना उपयोगी पडू शकते. अशा क्लिनिकमध्ये एज्युकेटर्स आपल्या पाल्याबरोबर कसं वागावं आपल्या मुलांबरोबर कसे संबंध असावेत या संदर्भात पालकांना मार्गदर्शन करू शकतात आणि पालकांनी आपल्या घरातील वातावरण, एकंदर मुलाचा स्वभाव याला अनुसरून घराचं वातावरण कसं ठेवावं या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील.
शेवटी काय तर वरील तीन गोष्टींमध्ये म्हणजेच टीचर्स क्लिनिक, स्टूडेंट्स क्लिनिक, पॅरेंट्स क्लिनिक मध्ये एक गोष्ट समान आहे. ही म्हणजे वरील वेगवेगळ्या घटकांना येणाऱ्या समस्या ऑनलाईनच्या माध्यमातून सोडण्याचे ठिकाण म्हणजेच ‘एज्युकेशनल ई-क्लिनिक’ होय आणि भविष्यात अर्थात नजिकच्या काळामध्ये एज्युकेशनल ई-क्लिनिक एक नवीन संकल्पना नव्याने उदयाला येण्याची दाट शक्यता मला तरी वाटते. तर चला, या नवीन संकल्पनेचे आपण आत्तापासूनच स्वागत करूया आणि एक नवीन शैक्षणिक बाब म्हणून याच्याकडे बघूया. धन्यवाद!
Share Post