गुगल फॉर्म्स

l1

गेल्या तीन-चार वर्षांमध्ये गुगल फॉर्म्स हा सर्वांच्या परिचयाचा शब्द बनला आहे. खासकरून लॉकडाऊनच्या काळात तर याचं महत्व आणि वापर दोन्हीही किती वाढलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ‘गुगल फॉर्म्’' ही गुगलची एक विनामूल्य ऑनलाईन सेवा आहे. या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारची माहिती संकलित करू शकतो व संकलित केलेल्या माहितीचं अगदी सहजरित्या विश्लेषण करणं देखील सोपं आहे. गुगल फॉर्म्स हा ऑनलाईन सर्वेक्षण, संपर्क फॉर्म, डेटा संकलन यासाठी वापरला जातो. पण आजच्या या लेखामध्ये आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून गुगल फॉर्म्सचा उपयोग कसा होऊ शकतो हे पाहणार आहोत.
आपल्याला माहिती संकलन करत असताना वापरकर्त्यांकडून माहिती अथवा डेटा मिळवायचा असेल तर एक ऑनलाइन फॉर्म ‘गुगल फॉर्म्स’च्या माध्यमातून तयार केला जातो व तो आवश्यक तेथे शेअर करता येतो. उदा. सोशल मीडिया, ब्लॉग किंवा वेबसाईट आदी वर शेअर करून माहिती संकलित करता येऊ शकते. गुगल फॉर्म आपण कॉम्प्युटर किंवा मोबाईल या दोन्ही वरही तयार करू शकतो. आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून गुगल फॉर्म्सचा उपयोग कसा होऊ शकतो हे पाहूया. गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून आपण ऑनलाइन सर्वेक्षण करू शकतो, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रश्नपत्रिका घेण्यासाठी क्वीझ ऑप्शन निवडून फॉर्म्स तयार करता येते. त्याचबरोबर शाळेच्या एखाद्या कार्यक्रमाची नोंदणी अर्थात रजिस्ट्रेशन करण्यासाठीही आपण हा फॉर्म वापरू शकतो. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, संपर्काची माहिती एकत्रित करण्यासाठीही गुगल फॉर्म्स अगदी सहजरीत्या वापरता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांचा वैयक्तिक बायोडेटा त्याचबरोबर, कॉलेजच्या मुलांच्या कौशल्यानुसार त्यांचा जॉब फॉर्म्स तयार करणे, त्यांनी केलेल्या कामांच्या, कौशल्याच्या डॉक्युमेंट्स फाइल्स अपलोड करण्यासाठीसुद्धा गुगल फॉर्म्स अतिशय उपयुक्त ठरतो. महत्त्वाचे म्हणजे यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क गुगलकडून आकारलं जात नाही, ही विनामूल्य सेवा आहे. तसंच याची संकलित माहिती ही क्लाऊडला स्टोअर केली, साठवली जाते. गुगल फॉर्म्स च्या माध्यमातून संकलित झालेली माहिती ही एका स्प्रेडशीटमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या क्रमानुसार आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला त्या माहितीचं विश्लेषण करणं, त्यावर आधारित पुढील नियोजन करणं सोयीचं होतं. शाळेच्या बाबतीत विचार केला, तर मुलांच्या संदर्भातली वैयक्तिक माहिती आपण प्रवेश फॉर्म्सच्या माध्यमातून एकत्रित केली तर बऱ्याच गोष्टी आपल्याला या फॉर्म्सच्या, डेटाच्या माध्यमातून वापरता येते. उदाहरणार्थ मुलाचे पूर्ण नाव, पालकाचा ई-मेल आयडी, संपर्कासाठी मोबाईल नंबर, जन्मतारीख, जन्मस्थळ, जात, संवर्ग, पूर्वीची शाळा, विद्यार्थ्यांची प्रगती यासारख्या महत्वाच्या नोंदी, ज्या शाळेच्या एक नंबर रजिस्टरसाठी महत्त्वाच्या असतात, त्याचं संकलन उपलब्ध करता येतं.
ही माहिती हरवण्याची, खराब होण्याची कोणतीही काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण गुगल फॉर्म्स मधली सर्व माहिती ही गुगलच्या ‘ड्राईव्ह’ मध्ये सुरक्षित असते. ज्या ईमेल आयडीचा वापर करून आपण गुगल फॉर्म तयार केला आहे त्याचा ई-मेल आयडी व पासवर्ड जर आपण जतन करून ठेवला तर या माहितीला आपल्या खेरीज इतरांना पाहता येणार नाही. आणि जिथं जिथं आपल्याला आवश्यक असेल त्याठिकाणी आपण कोणत्याही वेळी माहिती पाहू शकतो, एडीट करू शकतो व इतरांना ती शेअरसुद्धा करू शकतो. आहे की नाही गंमत! एक तर ‘मोफत’ पण तितकीच ‘अमूल्य’ अशी माहिती आपण गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून जमा करू शकतो. नमुन्यासाठी लिंक देतोय. https://youtu.be/wJMeydYCihU या लिंकला क्लिक करून तुम्ही गुगल फॉर्म्स कसा तयार करायचा? याचं एक प्रात्यक्षिक बघू शकता. ज्या माध्यमातून तुम्हाला गुगल फॉर्म्स करणं किती सोप आणि किती महत्वाचा आहे हे लक्षात येईल. गुगल फॉर्ममुळे अनेक तासांचे काम अगदी काही मिनिटात होतात त्याचबरोबर यासाठी आपण नेहमी ऑनलाईन राहण्याची आवश्यकता नाही काही दिवसांची आपण लिमिट देऊन सुद्धा हा डाटा संकलित करू शकतो वेबसाईट वर एखादी माहिती भरण्यापेक्षा फॉर्म च्या माध्यमातून भरलेली माहिती तात्काळ सबमिट व्हायला मदत होते. कारण यासाठी जास्त ऑनलाईन ट्राफिक असत नाही त्यामुळे अगदी काही क्षणात माहिती सबमीट करता येते. आजच्यासाठी इतकंच!
स्क्रीन कास्ट कशी करावी? याचा नमुना पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओची https://youtu.be/smboQpyfG2Y ही लिंक आपल्याला उपयुक्त ठरेल.


Share Post