स्क्रीन कास्ट

l1

विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची कक्षा वाढवण्याचा एक मार्ग!
आज मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट,प्रोजेक्टर आदी इक्विपमेंट्सचा शिक्षणामध्ये वापर वाढलाय. त्यामुळं ई-लर्निंग प्रक्रिया अधिक गतिमान होताना दिसतेय. यामध्ये आणखी एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ‘स्क्रीन कास्ट’ किंवा ‘स्क्रीन मिरर’चा. या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत की, स्क्रीन कास्ट म्हणजे काय? आणि स्क्रीन कास्टचा आपल्या शिक्षणात कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण उपयोग करता येऊ शकतो या संदर्भातील माहिती.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ‘स्क्रीन कास्ट’ म्हणजे एखाद्या माध्यमाची स्क्रीन दुसऱ्या माध्यमावर वापरणं होय. म्हणजे मोबाईलवरील व्हिडिओ जशाचा तसा आपल्याला कॉम्प्युटर,लॅपटॉप किंवा प्रोजेक्टवरती दाखवता येणं शिवाय लॅपटॉपची स्क्रीन जशास तशी मोबाईलवरती दाखवता येणं होय. जर एखादे शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवताना जर मोबाइलच्या माध्यमातून शिकवत असतील तर वर्गातील सर्व मुलांपर्यंत पोचण्यासाठी मोबाईलची ती लहान स्क्रीन पुरेशी पडणार नाही. कारण काही अंतरावरून मुलांना मोबाईलवर काय दाखवत आहेत? हे मुळात कळणारच नाही. त्यामुळं मुलाचं शिक्षकांच्या सांगण्या, शिकवण्याकडं जास्त लक्ष वेधलं जाणार नाही. परिणामी मोबाईलच्या माध्यमातून वर्गात शिकवण्यास मर्यादा येईल. यावर उपाय म्हणून स्क्रीन कास्ट हा पर्याय वापरला येईल. यासाठी आपल्याकडं जर अँड्रॉइड टीव्ही असेल तर आपण आपल्या मोबाईलची स्क्रीन जशीच्या तशी टिव्हीवर आणू शकतो. यासाठी आपल्या मोबाईल मध्ये स्क्रीन कास्ट किंवा स्क्रीन मिरर नावाचं ऑप्शन अथवा ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढच्या टीव्हीमध्ये सुद्धा या प्रकारचं सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे. दोन्हीमध्ये एकाच प्रकारचं ॲप्लिकेशन असेल तर स्क्रीन कास्ट होण्यास अडचण येत नाही. आणि या दोन्ही माध्यमांना जोडण्यासाठी वायफाय सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळं मोबाईलवरील ज्या ज्या गोष्टी आपल्याला मुलांना दाखवायच्या असतात, त्या त्या गोष्टी टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर दाखवणं सोयीचं होतं.
स्क्रीन कास्टिंगच्या माध्यमातून आपण मुलांना रियल टाइम इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. त्याचबरोबर व्हिडिओ, पीडीएफ, पीपीटी, MP3 आदी गोष्टी आपण स्क्रीन कास्ट माध्यमातून एका स्क्रीनवरून दुसऱ्या स्क्रीनवर दाखवू शकणार आहोत. ज्यामुळे मुलांना सगळ्या गोष्टी मोठ्या आकारामध्ये दिसण्यास मदत होते व त्यांना तो घटक समजणं सोपं जातं. सहाजिकच मोठ्या पडद्यामुळं मुलांचं सर्व लक्ष हे त्या टीव्हीवरच राहतं. ज्यातून आपल्याला त्यांची एकाग्रता आणि ग्रहण क्षमता या दोन्ही वाढवता येतात. परिणामी मुलांना एखादी गोष्ट समजून सांगणं नेहमीपेक्षा जास्त सोपं होतं.
मी गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना माझ्या मोबाईलवरचे वेगवेगळे व्हिडिओज स्क्रीन कास्ट करून समोर असणाऱ्या 50 इंची अँड्रॉइड टीव्हीवर अगदी सहजरित्या दाखवू शकतो. मोबाईलची प्रत्येक क्रिया, आवाज हा पुढील टीव्हीमधून येतो. त्यामुळं अनेक गोष्टींची सेटिंग्स करणं सोपं जातं. म्हणून आजच्या काळामध्ये मोबाईलला मोठ्या आकारात दाखवायचं असेल तर तो पर्याय म्हणजे मोबाईलची स्क्रीन कास्ट करणं होय. मोबाईलवर पूर्वी दाखवत असलेल्या पाठापेक्षा स्क्रीन कास्ट करून दाखवलेला पाठ हा मुलांच्या जास्त स्मरणात राहतो असा माझा एकंदर अनुभव आहे. कारण मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यामुळं सहाजिकच मुलांच्या मनामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने त्यावरच्या प्रतिमा साठविल्या जातात.
स्क्रीन कास्ट कशी करावी? याचा नमुना पाहण्यासाठी माझ्या या व्हिडिओची https://youtu.be/smboQpyfG2Y ही लिंक आपल्याला उपयुक्त ठरेल.


Share Post