मागील लेखामध्ये आपण पाहिलं की, प्रत्यक्षात मुलांना समोर न बसवताही ऑनलाईन पद्धतीनं, व्हर्च्युअली परीक्षा कशी घ्यायची? या संदर्भातील माहिती. आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की, ई परीक्षा ऑफलाईन कशी घ्यायची? यासंबंधी सविस्तर माहिती. यासाठी देखील आपल्याला भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरण द्यायचंच झालं तर एक्सेल, पावर पॉइंट प्रेसेंटेशन (पीपीटी) आणि प्लेस्टोर वर असणारे असंख्य ऑफलाईन ॲप्स. या सर्वांच्या माध्यमातून आपण ऑफलाईन ई परीक्षा घेऊ शकतो. जरी परीक्षा आपण ऑफलाईन घेत असलो, तरी याला डाऊनलोड करण्यासाठी मात्र काही वेळासाठी का होईना आपलं इंटरनेट चालू असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही वाय-फायने सुद्धा हे शेअर करू शकाल.
आज अनेक शिक्षक बांधव तंत्रस्नेही म्हणून स्वतःला तयार करत आहेत. हे करत असताना अनेक नवकल्पनाही राबवत आहेत. एक्सेलमध्ये वेगवेगळे फॉर्म्युले वापरून ऑफलाईन टेस्ट तयार करत आहेत. वेगवेगळे प्रश्न व त्यांच्या उत्तरांचे बहुपर्याय देऊन मुलांसाठी परीक्षा आयोजित करत आहेत. यामध्ये पिवोट टेबल या एक्सेल च्या आतील एका ऑप्शनला निवडून अनेक गणिती क्रियांची उदाहरणं मुलांना उपलब्ध करून देत आहेत. प्रत्येक वेळेस नवीन गणित एक्सेलमध्ये ऑफलाइन देण्याची व्यवस्था या माध्यमातून करता येते. माझे मित्र परवेज शेख यांनी खेळण्याचं दुकान हे सॉफ्टवेअर एक्सेलमध्ये तयार केले आहे. ज्या माध्यमातून मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सारख्या गणितीय मूलभूत क्रिया करणं, त्याचा सराव करणं सोयीचं होत आहे.
या पर्यायाबरोबरच पीपीटी हा एक उत्तम पर्याय आहे. ज्या माध्यमातून आपण ऑफलाईन परीक्षा अर्थात मूल्यमापन घेता येतं, करता येतं. तुम्ही पीपीटीमध्ये जर प्रश्न-उत्तरे व त्यांचे बहुपर्याय दिले तर आपण यामध्ये हायपरलिंक वापरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर किंवा चूक यापैकी जे उत्तर मुलांना योग्य वाटतं ते मुलं निवडू शकतात. निवडण्यासाठी आपल्याला ‘हो’–‘नाही’ किंवा ‘उत्तर बरोबर’– ‘उत्तर चूक’ आहे अशा स्वतंत्र स्लाईड्स तयार करून त्याच्या प्रश्नांनुसार योग्य उत्तराला वरीलपैकी स्लाईडला हायपरलिंक करून आपल्याला ही ई-परीक्षा घेणं सोयीचं होईल.
शेवटी प्ले स्टोअरवर अनेक ऑफलाईन चालणारे ॲप्स आहेत त्यांना एकदा डाऊनलोड केल्यानंतर त्या ॲप्सच्या माध्यमातूनही मुलांची परीक्षा घेण्यासाठी घेता येऊ शकते. त्याच्यामध्ये आपल्याला बाराखडी असेल, पाढे असतील, गणित असतील, वेगवेगळे भौमितिक आकार असतील, वेगळ्या वस्तूंच्या जोड्या लावणं जसं फळ भाज्या प्राणी यांची माहिती, या प्राण्यांचे आवाज इत्यादी प्रकारचे खूपसे ॲप्स प्ले स्टोअर वर उपलब्ध आहेत जे आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून मुलांना त्यांची ऑफलाइन परीक्षा आपल्याला घेता येते आणि हे करत असताना मुलांना कुठंही जाणवत नाही की, ते एक प्रकारची परीक्षा देत आहेत. हा या मधला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणता येईल.
अनेक ॲप्स असे आहेत की, ज्या वेळेस उत्तर बरोबर येतात त्या ठिकाणी त्यांना ठराविक स्टार देण्याची पद्धत ठेवली आहे. त्यामुळे जितके स्टार तितका मुलांचा आनंद असं समीकरण च्या माध्यमातून झालेलं मला जाणवतं पण उत्तर चुकलं तर नेमकं उत्तर काय आहे ही शोधण्याची जिज्ञासू वृत्ती सुद्धा यातून निर्माण झालेली आहे. आज जरी या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला वाचताना थोड्या अनोळखी वाटत असल्यातरी तंत्रस्नेही शिक्षकांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आत्मसात करू शकता. अशाप्रकारे मुलांचं मूल्यमापन करणं सोयीचं होईल असा विश्वास वाटतो.
Share Post